Wednesday, November 14, 2012

पदकांच (अवार्ड्स) गौडबंगाल


पदकांच (अवार्ड्स) गौडबंगाल


मी एक प्राचार्य बघितले आहेत. प्राचार्य म्हटलं कि, एक सोज्वळ चेहरा समोर येतो. कॉलेज व्यवस्थित पणे चालविणारा, आपल्या सर्व स्टाफला विश्वासात घेणारा, विद्यार्थ्यांना दिशा देणारा. पण मी पाहिलेले हे महाशय अगदीच विचीत्र आहेत. पदकांचा यांना भारी शौक. आपण अत्यंत कमी वयात खूप ज्ञानी आहोत असा यांना भलताच अभिमान. आपल्याला मिळालेली पदकेही सर्व ठिकाणी अश्या पद्धतीने लाऊन ठेवायची कि येणाऱ्या जाणाऱ्यांनी पहाता क्षणीच यांच्या प्रेमात पडावं. बरं पदकं इतकी होती कि ऑलम्पिक मध्ये चायनाला सुद्धा पदकं घेताना लाज वाटावी.

  एक सार्थ प्राचार्य मिळाल्याचा अभिमान व्यवस्थापनाला वाटत होता. स्टाफ ला देखील असा देवमाणूस आपल्या कॉलेजला लाभल्याचा हेवा वाटत होता. पण हे सर्व काही दिवसच. हळू हळू सापाने आपली जात दाखवायला सुरुवात करावी तसं ह्या महोदयांनी वाटेल तशी मनमानी सुरु केली. मी म्हणेल तीच पूर्व दिशा, आणि मी सांगेल तोच नियम अश्या पद्धतीच काम सुरु झालं. स्टाफ हैराण झाला. विद्यार्थी तर पार मेटाकुटीला आले. पालक सभेमध्ये देखील मी किती भारी ह्याचे गुणगान प्राचार्य करू लागले. दिल्लीहून कॉलेज ला चांगली ग्रेड मिळाली. पण ती देखील माझ्याचमुळे मिळाली. त्याच देखील क्रेडीट यांनी स्वतःकडे घेतलं. सर्वांनी सांगून झालं, विभाग प्रमुखांनी सांगितलं पण हे महाशय काही ऐकायला तयार नाही.

 मग सर्वांनी यांच बारकाईनं निरीक्षण केलं. यांच अगोदरच कॉलेज, अगोदरची पार्श्वभूमी. यांना जेंव्हा अगोदरच्या कॉलेज ने निरोप दिला तेंव्हा तर तिथल्या विद्यार्थ्यांनी भर उन्हाळ्यात फटाके वाजवून दिवाळी साजरी केली. तिथल्या स्टाफ ने देखील सुटकेचा निश्वास सोडला. परंतु कुत्र्याची शेपूट ती कुत्र्याचीच शेपूट ती काही केल्या सरळ होत नाही. नवीन कॉलेज मध्ये आल्या आल्या यांना पदक मिळालं. यांच्या कार्यपद्धतीवर खूष होऊन विद्यार्थी संघटनांनी यांना घेराव टाकला. घेराव होऊन २ महिने होतात न होतात तोच यांना दुसरं पदक. कॉलेजला ग्रेड मिळाल्यानंतर पुन्हा तिसरं पदक. स्टाफ ने एकदा कंटाळून यांना घेराव टाकला. तर पुढच्याच आठवड्यात पुन्हा नवीन पदक उत्कृष्ट शिक्षकाचं. आणि स्वतःच, अभिनंदनाचा ठराव पास करायचा आणि व्यवस्थापनाला आनंद झाला म्हणत नोटीस बोर्डवर नोटीस लावायची. ते बघून काही हुजरे मंडळींमध्ये त्यांचं अभिनंदन करताना धांदल उडायची. मग काही हुजरे पेपर मध्ये छापून आणायचे आणि शाबासकी मिळवायचे. यांचा मात्र एक पेपर फारच आवडता ज्यात मोठी बातमी अवार्ड्स ची यायची. बातमी आल्यावर ती कापायची, जम्बो कलरफुल झेरॉक्स काढायची, त्याला लँमिनेशन करायचे आणि सर्वांना दिसेल अश्या पद्धतीने काचेखाली ठेवायची. तोच पेपर कधीतरी यांची गोची करून ठेवील असं भाकीत बऱ्याच जाणकारांनी वर्तविले आहे.

   सर्व अवार्ड जर बारकाईन पहिले तर हे बहुतेक सर्व अवार्ड दिल्ली मधील आहेत. दिल्लीत अवार्ड वाटण्याची दुकाने आहेत. आपण जर अवार्ड लिस्ट घेऊन बसलो आणि सर्व अवार्ड्सची वेबसाईट पाहिली तर एकच सरदार दोन ठिकाणी अवार्ड देत आहे. पैसे देऊन अवार्ड वाटणा-यांची टोळीच कार्यरत आहे कि काय अशी शंका येते. बर यात कोणीही तुमच योगदान बघत नाही. व्यवस्थित पणे पाहुणे अवार्ड देण्यासाठी आणले जातात. पैसे दिले कि अवार्ड तयार. आणि कोण चेक करत? अहो who’s who मध्ये नाव येणाऱ्या व्यक्तींपैकी पैकी काही व्यवस्थापन फक्त प्राचार्यांचाच सत्कार करतात अशी माहिती आहे. त्यांच्या बायकोला आणि त्यांना पोषाख करतात. तो जागतिक स्तरावरचा पैसे देऊन आणलेला अवार्ड सुद्धा तपासून पहात नाहीत. पैसे कॉलेजचे, सत्कार सुद्धा कॉलेजचा आणि मूर्ख बनवायचे तेही कॉलेजलाच. इतर कॉलेजचे प्राचार्य सुद्धा यांच्या प्रचारात सामील. कारण त्यांच्या सुपीक डोक्यातून निघालेला "जीवन गौरव“ अवार्ड साठी पुढील मोर्चेबांधणीला कोणाचाही विरोध होता कामा नये ही त्यामागची कल्पना. कोणी काही तपासून पहात नाही. किमान आहेत ते दिल्लीतले तरी अवार्ड तपासून बघा. खर खोट समजून जाईल. नुसतं डोळे झाकून अभिनंदाच्या पत्रावर आपली नावं टाकायची आणि व्यवस्थापनाने आपले कौतुक केले म्हणत प्राचार्यांनी त्याची दवंडी द्यायची. तोही धन्य आणि आपणही धन्य. अवार्डचं हे गौड बंगाल कधी संपेल ते संपो. सुज्ञानी त्याच्या वाटेला सुद्धा जाऊ नये. अवार्ड पेक्षा आपली कर्म बोलकी असावीत. लोकांनी सहजपणे ती इतरांना सांगावीत त्यातच तुमचा मोठेपणा असतो.

  “म्हैसा नुठी का पुरा” म्हणजेच पूर आलेला असताना सुद्धा रेडा नदीच्या पात्रात बसूनच राहतो. त्याला पूर आलेला सुद्धा समजत नाही. आणि समजलं तरी तो उठत नाही. नुसताच ठोंब्यासारखा बसून राहतो. मी म्हणेल तेच खर, असं साजेसं व्यक्तिमत्व स्वतःच नाही परंतु मालकाचं मात्र खूप नुकसान करतं. रेड्याची चालीसा गाण्यामध्ये गुंग झालेल्या मालकांना कळेल तेंव्हा खूप उशीर झालेला असेल.

(टीप :- या संपूर्ण ब्लॉग मधील मते ही केवळ काल्पनिक आहेत. जर कोणाशी ही मते मिळती जुळती असतील तर तो निव्वळ योगा-योग समजावा. कोणालाही, कोणत्याही लेखाबद्दल जर काही आक्षेप असल्यास त्यांनी निसंकोच पणे Email – vnarawade@gmail.com वर संपर्क करावा जेणे करून आपल्या मनातील शंका दूर होण्यास मदत करता येईल) 

Tuesday, November 13, 2012

आंदोलनातून झालेलं निलंबन


       आंदोलनातून झालेलं निलंबन

      नमस्कार.!!! बरेच दिवसांनी ब्लॉगवर लिखाण सुरु करीत आहे. मधल्या काळात बरीचशी कामे होती, अन्य व्यवधाने होती. काही ना काही निमित्ताने गावी जाव लागे. असो पुन्हा श्री गणेशा करीत आहे. किती दिवस हे चालेल माहित नाही. वेळ मिळेल तसं ब्लॉग वर लिहाव असा विचार सुरु आहे. अर्थात सुरुवात माझ्याच पासून. अभियांत्रिकी महाविद्यालयांवर लक्ष केंद्रित करावं असाही विचार आहे. निलंबित असणाऱ्यांना वेळच वेळ असतो असं ऐकल आहे, हे खरं आहे कि खोटं लवकरच कळेल.

      कॉलेजमध्ये आंदोलन झालं म्हणून फक्त माझ्या एकट्याच निलंबन केलं गेलं. आंदोलनात जवळपास ४०० ते ४५० विद्यार्थी तसेच बहुतेक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यापीठाचे नियम न पाळता महाविद्यालयाला स्वायतत्ता मिळाली असं समजून जाचक नियम बंधनकारक करायचे. हे सहन न झाल्यानेच उत्स्फुर्तपणे हे आंदोलन झाले. दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये देखील बातम्या आल्या. पेपर मध्ये देखील प्राचार्यांच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत अशी विधाने आली परंतु प्राचार्यांवर कारवाई करायची सोडून एकाचचं निलंबन केलं गेलं. आंदोलन होण्याच्या अगोदर सर्व विभागप्रमुखांच्या सहीने, प्राचार्यांच्या कार्य पद्धतीवर खेद व्यक्त करणारे पत्र व्यवस्थापनाला दिले होते. जनभावना समजून न घेता, सत्ता असल्यावर काहीही करता येतं हा अनुभव इथेदेखील अपवाद ठरत नाही.

     आपल्या आजूबाजूचे सल्ला देणारे कितपत विश्वासास पात्र आहेत, किमान त्याचा देखील विचार व्हायला हवा होता. बरं सल्लागार कोण? जो कोर्स बंद पडला, ज्यांनी कधी लेक्चर घेतलं नाही, अजूनही काही काम न करता ज्यांचा पगार निघतो, बंद पडलेल्या बोटीचा कप्तान म्हणून लोक उपहासानं म्हणतात आणि आपण काही काम करत नसताना, विद्यार्थी नसताना, कोर्स बंद असताना निर्लज्जपणे सर्व सामान्य विद्यार्थ्यांच्या फी मधून पगार घेतो. याची ज्यांना जनाची नाही परंतु मनाची देखील लाज वाटत नाही ते सल्लागार, आणि बाकीच्यांचं म्हणाल तर संस्थेसाठी त्यांचं योगदान कदाचित मोठं असेल परंतु त्यांच्याही मनात माझ्याबद्दल पूर्व दुषित ग्रहच होता. त्यांनी देखील कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मागचं मी उकरून नाही. किंबहुना तो माझा स्वभाव नाही. परंतु माझी बाजू शेवटपर्यंत ऐकून घेतली नाही. सगळ्यांच ऐकून पूर्व दुषित ग्रह मनात ठेवूनच निर्णय घेतला गेला. खरं-खोटं काय आहे हे देखील माहित करून घेतलं नाही निव्वळ आजूबाजूच्यांनी जे सांगितलं त्यावरच विश्वास ठेवला गेला.

      निलंबन झाल्यानंतर कॉलेजमध्ये जे दहशतीच वातावरण निर्माण केलं गेलं, ते सुद्धा कोणी थांबवलं नाही. परीक्षा चालू असताना प्राचार्य वर्गावर्गात जाऊन FIR च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून लिहून घेत होते. कॅमेऱ्यात जे दिसतील त्यांना केबिन मध्ये बोलावून झापत होते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार विद्यार्थ्यांना सहन करावा लागत होता. हे कमी म्हणून कि काय जे आंदोलनात दिसले त्या सर्व जवळपास ४० जणांना सामुहिक मेमो वाटप करण्यात आले. दिल्लीत असताना लोक पंतप्रधानाच्या घरासमोर आंदोलन करीत होते. एकजण तर लोकसभेमध्ये घुसला व संध्याकाळी पुन्हा आंदोलनस्थळी मैदानात दिसला. त्यांच्यावर काही झालं नाही. पण कॉलेज मध्ये कहर केला गेला. मेमो ची उत्तरे देताना पुन्हा बाष्कळ बडबड ऐकायची, काहीना झापायाचं तर काहीना मस्का, मी किती चांगला हे धूर्तपणे सांगायचं. निमूटपणे सहन करणारा परंतु, मनात मात्र खदखद व्यक्त करणारा स्टाफ व विद्यार्थी त्याही वेळेस माझ्या संपर्कात होता आणि आजही आहे.

     भर दिवाळीत निलंबनाची कटुता अनुभवत आहे. घरातील वातावरण अध्यात्मिक असल्याने, बरेच वेळा माझ्या नशिबाने का होईना, लहान भावाकडून व नामवंत महात्म्यांकडून वेदांतावरील भाष्य ऐकलेले आहे. त्यामुळे दुःखाची झळ कमी प्रमाणात अनुभवत आहे तीही लौकिकार्थाने. आईचे आशीर्वाद आहेतच. या सर्व प्रकाराला मी सामोरा जाणार आहे. सत्य फार काळ लपून राहणार नाही. आपल्या शुभेछ्या आहेत याचीही जाणीव आहे. जे आजही मनाने माझ्या बरोबर आहेत ते सर्व स्टाफ, विद्यार्थी, व्यवस्थापन, शुभचिंतक यांना मनःपूर्वक सलाम... दीपोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेछ्या. ही दिवाळी आपणा सर्वांना सुखासमाधानाची जावो, भरभराटीची जावो, आरोग्यदायी जावो हीच प्रार्थना. माउलींच्या पसायदानाप्रमाणे “जो जे वांछील, तो ते लाहो, प्राणिजात”.