पदकांच (अवार्ड्स) गौडबंगाल
मी एक प्राचार्य बघितले आहेत. प्राचार्य म्हटलं कि, एक सोज्वळ चेहरा समोर येतो.
कॉलेज व्यवस्थित पणे चालविणारा, आपल्या सर्व स्टाफला विश्वासात घेणारा,
विद्यार्थ्यांना दिशा देणारा. पण मी पाहिलेले हे महाशय अगदीच विचीत्र आहेत. पदकांचा
यांना भारी शौक. आपण अत्यंत कमी वयात खूप ज्ञानी आहोत असा यांना भलताच अभिमान. आपल्याला
मिळालेली पदकेही सर्व ठिकाणी अश्या पद्धतीने लाऊन ठेवायची कि येणाऱ्या जाणाऱ्यांनी
पहाता क्षणीच यांच्या प्रेमात पडावं. बरं पदकं इतकी होती कि ऑलम्पिक मध्ये चायनाला
सुद्धा पदकं घेताना लाज वाटावी.
एक सार्थ प्राचार्य मिळाल्याचा अभिमान व्यवस्थापनाला वाटत होता. स्टाफ ला
देखील असा देवमाणूस आपल्या कॉलेजला लाभल्याचा हेवा वाटत होता. पण हे सर्व काही
दिवसच. हळू हळू सापाने आपली जात दाखवायला सुरुवात करावी तसं ह्या महोदयांनी वाटेल
तशी मनमानी सुरु केली. मी म्हणेल तीच पूर्व दिशा, आणि मी सांगेल तोच नियम अश्या
पद्धतीच काम सुरु झालं. स्टाफ हैराण झाला. विद्यार्थी तर पार मेटाकुटीला आले. पालक
सभेमध्ये देखील मी किती भारी ह्याचे गुणगान प्राचार्य करू लागले. दिल्लीहून कॉलेज
ला चांगली ग्रेड मिळाली. पण ती देखील माझ्याचमुळे मिळाली. त्याच देखील क्रेडीट
यांनी स्वतःकडे घेतलं. सर्वांनी सांगून झालं, विभाग प्रमुखांनी सांगितलं पण हे
महाशय काही ऐकायला तयार नाही.
मग सर्वांनी यांच बारकाईनं निरीक्षण केलं. यांच अगोदरच कॉलेज, अगोदरची
पार्श्वभूमी. यांना जेंव्हा अगोदरच्या कॉलेज ने निरोप दिला तेंव्हा तर तिथल्या
विद्यार्थ्यांनी भर उन्हाळ्यात फटाके वाजवून दिवाळी साजरी केली. तिथल्या स्टाफ ने
देखील सुटकेचा निश्वास सोडला. परंतु कुत्र्याची शेपूट ती कुत्र्याचीच शेपूट ती
काही केल्या सरळ होत नाही. नवीन कॉलेज मध्ये आल्या आल्या यांना पदक मिळालं.
यांच्या कार्यपद्धतीवर खूष होऊन विद्यार्थी संघटनांनी यांना घेराव टाकला. घेराव
होऊन २ महिने होतात न होतात तोच यांना दुसरं पदक. कॉलेजला ग्रेड मिळाल्यानंतर
पुन्हा तिसरं पदक. स्टाफ ने एकदा कंटाळून यांना घेराव टाकला. तर पुढच्याच आठवड्यात
पुन्हा नवीन पदक उत्कृष्ट शिक्षकाचं. आणि स्वतःच, अभिनंदनाचा ठराव पास करायचा आणि
व्यवस्थापनाला आनंद झाला म्हणत नोटीस बोर्डवर नोटीस लावायची. ते बघून काही हुजरे
मंडळींमध्ये त्यांचं अभिनंदन करताना धांदल उडायची. मग काही हुजरे पेपर मध्ये छापून
आणायचे आणि शाबासकी मिळवायचे. यांचा मात्र एक पेपर फारच आवडता ज्यात मोठी बातमी
अवार्ड्स ची यायची. बातमी आल्यावर ती कापायची, जम्बो कलरफुल झेरॉक्स काढायची,
त्याला लँमिनेशन करायचे आणि सर्वांना दिसेल अश्या पद्धतीने काचेखाली ठेवायची. तोच
पेपर कधीतरी यांची गोची करून ठेवील असं भाकीत बऱ्याच जाणकारांनी वर्तविले आहे.
सर्व अवार्ड जर बारकाईन पहिले तर हे बहुतेक सर्व अवार्ड दिल्ली मधील आहेत.
दिल्लीत अवार्ड वाटण्याची दुकाने आहेत. आपण जर अवार्ड लिस्ट घेऊन बसलो आणि सर्व
अवार्ड्सची वेबसाईट पाहिली तर एकच सरदार दोन ठिकाणी अवार्ड देत आहे. पैसे देऊन
अवार्ड वाटणा-यांची टोळीच कार्यरत आहे कि काय अशी शंका येते. बर यात कोणीही तुमच
योगदान बघत नाही. व्यवस्थित पणे पाहुणे अवार्ड देण्यासाठी आणले जातात. पैसे दिले
कि अवार्ड तयार. आणि कोण चेक करत? अहो who’s who मध्ये नाव येणाऱ्या व्यक्तींपैकी पैकी काही
व्यवस्थापन फक्त प्राचार्यांचाच सत्कार करतात अशी माहिती आहे. त्यांच्या बायकोला
आणि त्यांना पोषाख करतात. तो जागतिक स्तरावरचा पैसे देऊन आणलेला अवार्ड सुद्धा
तपासून पहात नाहीत. पैसे कॉलेजचे, सत्कार सुद्धा कॉलेजचा आणि मूर्ख बनवायचे तेही
कॉलेजलाच. इतर कॉलेजचे प्राचार्य सुद्धा यांच्या प्रचारात सामील. कारण त्यांच्या
सुपीक डोक्यातून निघालेला "जीवन गौरव“ अवार्ड साठी पुढील मोर्चेबांधणीला
कोणाचाही विरोध होता कामा नये ही त्यामागची कल्पना. कोणी काही तपासून पहात नाही. किमान
आहेत ते दिल्लीतले तरी अवार्ड तपासून बघा. खर खोट समजून जाईल. नुसतं डोळे झाकून
अभिनंदाच्या पत्रावर आपली नावं टाकायची आणि व्यवस्थापनाने आपले कौतुक केले म्हणत प्राचार्यांनी
त्याची दवंडी द्यायची. तोही धन्य आणि आपणही धन्य. अवार्डचं हे गौड बंगाल कधी संपेल
ते संपो. सुज्ञानी त्याच्या वाटेला सुद्धा जाऊ नये. अवार्ड पेक्षा आपली कर्म बोलकी
असावीत. लोकांनी सहजपणे ती इतरांना सांगावीत त्यातच तुमचा मोठेपणा असतो.
“म्हैसा नुठी का पुरा” म्हणजेच पूर आलेला असताना सुद्धा रेडा नदीच्या पात्रात
बसूनच राहतो. त्याला पूर आलेला सुद्धा समजत नाही. आणि समजलं तरी तो उठत नाही.
नुसताच ठोंब्यासारखा बसून राहतो. मी म्हणेल तेच खर, असं साजेसं व्यक्तिमत्व स्वतःच
नाही परंतु मालकाचं मात्र खूप नुकसान करतं. रेड्याची चालीसा गाण्यामध्ये गुंग
झालेल्या मालकांना कळेल तेंव्हा खूप उशीर झालेला असेल.
(टीप :- या संपूर्ण
ब्लॉग मधील मते ही केवळ काल्पनिक आहेत. जर कोणाशी ही मते मिळती जुळती असतील तर तो
निव्वळ योगा-योग समजावा. कोणालाही, कोणत्याही लेखाबद्दल जर काही आक्षेप असल्यास
त्यांनी निसंकोच पणे Email – vnarawade@gmail.com वर संपर्क करावा जेणे करून
आपल्या मनातील शंका दूर होण्यास मदत करता येईल)
1 comment:
खपच छान. लागे राहो. आम्हाला खेद आहे. तुमच्या बरोबर नेहमी आहोत. सर,तुम्ही नाहीत तर हा घाबरवत आहे.
Post a Comment