Tuesday, November 13, 2012

आंदोलनातून झालेलं निलंबन


       आंदोलनातून झालेलं निलंबन

      नमस्कार.!!! बरेच दिवसांनी ब्लॉगवर लिखाण सुरु करीत आहे. मधल्या काळात बरीचशी कामे होती, अन्य व्यवधाने होती. काही ना काही निमित्ताने गावी जाव लागे. असो पुन्हा श्री गणेशा करीत आहे. किती दिवस हे चालेल माहित नाही. वेळ मिळेल तसं ब्लॉग वर लिहाव असा विचार सुरु आहे. अर्थात सुरुवात माझ्याच पासून. अभियांत्रिकी महाविद्यालयांवर लक्ष केंद्रित करावं असाही विचार आहे. निलंबित असणाऱ्यांना वेळच वेळ असतो असं ऐकल आहे, हे खरं आहे कि खोटं लवकरच कळेल.

      कॉलेजमध्ये आंदोलन झालं म्हणून फक्त माझ्या एकट्याच निलंबन केलं गेलं. आंदोलनात जवळपास ४०० ते ४५० विद्यार्थी तसेच बहुतेक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यापीठाचे नियम न पाळता महाविद्यालयाला स्वायतत्ता मिळाली असं समजून जाचक नियम बंधनकारक करायचे. हे सहन न झाल्यानेच उत्स्फुर्तपणे हे आंदोलन झाले. दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये देखील बातम्या आल्या. पेपर मध्ये देखील प्राचार्यांच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत अशी विधाने आली परंतु प्राचार्यांवर कारवाई करायची सोडून एकाचचं निलंबन केलं गेलं. आंदोलन होण्याच्या अगोदर सर्व विभागप्रमुखांच्या सहीने, प्राचार्यांच्या कार्य पद्धतीवर खेद व्यक्त करणारे पत्र व्यवस्थापनाला दिले होते. जनभावना समजून न घेता, सत्ता असल्यावर काहीही करता येतं हा अनुभव इथेदेखील अपवाद ठरत नाही.

     आपल्या आजूबाजूचे सल्ला देणारे कितपत विश्वासास पात्र आहेत, किमान त्याचा देखील विचार व्हायला हवा होता. बरं सल्लागार कोण? जो कोर्स बंद पडला, ज्यांनी कधी लेक्चर घेतलं नाही, अजूनही काही काम न करता ज्यांचा पगार निघतो, बंद पडलेल्या बोटीचा कप्तान म्हणून लोक उपहासानं म्हणतात आणि आपण काही काम करत नसताना, विद्यार्थी नसताना, कोर्स बंद असताना निर्लज्जपणे सर्व सामान्य विद्यार्थ्यांच्या फी मधून पगार घेतो. याची ज्यांना जनाची नाही परंतु मनाची देखील लाज वाटत नाही ते सल्लागार, आणि बाकीच्यांचं म्हणाल तर संस्थेसाठी त्यांचं योगदान कदाचित मोठं असेल परंतु त्यांच्याही मनात माझ्याबद्दल पूर्व दुषित ग्रहच होता. त्यांनी देखील कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मागचं मी उकरून नाही. किंबहुना तो माझा स्वभाव नाही. परंतु माझी बाजू शेवटपर्यंत ऐकून घेतली नाही. सगळ्यांच ऐकून पूर्व दुषित ग्रह मनात ठेवूनच निर्णय घेतला गेला. खरं-खोटं काय आहे हे देखील माहित करून घेतलं नाही निव्वळ आजूबाजूच्यांनी जे सांगितलं त्यावरच विश्वास ठेवला गेला.

      निलंबन झाल्यानंतर कॉलेजमध्ये जे दहशतीच वातावरण निर्माण केलं गेलं, ते सुद्धा कोणी थांबवलं नाही. परीक्षा चालू असताना प्राचार्य वर्गावर्गात जाऊन FIR च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून लिहून घेत होते. कॅमेऱ्यात जे दिसतील त्यांना केबिन मध्ये बोलावून झापत होते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार विद्यार्थ्यांना सहन करावा लागत होता. हे कमी म्हणून कि काय जे आंदोलनात दिसले त्या सर्व जवळपास ४० जणांना सामुहिक मेमो वाटप करण्यात आले. दिल्लीत असताना लोक पंतप्रधानाच्या घरासमोर आंदोलन करीत होते. एकजण तर लोकसभेमध्ये घुसला व संध्याकाळी पुन्हा आंदोलनस्थळी मैदानात दिसला. त्यांच्यावर काही झालं नाही. पण कॉलेज मध्ये कहर केला गेला. मेमो ची उत्तरे देताना पुन्हा बाष्कळ बडबड ऐकायची, काहीना झापायाचं तर काहीना मस्का, मी किती चांगला हे धूर्तपणे सांगायचं. निमूटपणे सहन करणारा परंतु, मनात मात्र खदखद व्यक्त करणारा स्टाफ व विद्यार्थी त्याही वेळेस माझ्या संपर्कात होता आणि आजही आहे.

     भर दिवाळीत निलंबनाची कटुता अनुभवत आहे. घरातील वातावरण अध्यात्मिक असल्याने, बरेच वेळा माझ्या नशिबाने का होईना, लहान भावाकडून व नामवंत महात्म्यांकडून वेदांतावरील भाष्य ऐकलेले आहे. त्यामुळे दुःखाची झळ कमी प्रमाणात अनुभवत आहे तीही लौकिकार्थाने. आईचे आशीर्वाद आहेतच. या सर्व प्रकाराला मी सामोरा जाणार आहे. सत्य फार काळ लपून राहणार नाही. आपल्या शुभेछ्या आहेत याचीही जाणीव आहे. जे आजही मनाने माझ्या बरोबर आहेत ते सर्व स्टाफ, विद्यार्थी, व्यवस्थापन, शुभचिंतक यांना मनःपूर्वक सलाम... दीपोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेछ्या. ही दिवाळी आपणा सर्वांना सुखासमाधानाची जावो, भरभराटीची जावो, आरोग्यदायी जावो हीच प्रार्थना. माउलींच्या पसायदानाप्रमाणे “जो जे वांछील, तो ते लाहो, प्राणिजात”.

2 comments:

Unknown said...

पुर्वी फक्त राजकारणात चमच्या लोकांची चलती होती पण या आपल्या लेखा वरुन असे दिसून येत आहे की ही चमचेगिरी ची मक्तेदारी शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात ही घुसली आहे आणि याचे खरे कारण हे आहे की "लायकी नसणार्‍या वेक्ति नको त्या ठिकाणी जाऊन बसल्या आहेत,लायकी नसणार्‍या लोकांचा वेळीच बीमोड केला तरच शिक्षण क्षेत्राचे भले होईल

manju said...

Collegemedhye anubhavat ahot.