Wednesday, August 13, 2014

अभियांत्रिकी मधून पी.एच.डी. झालेल्यांना आणि प्राचार्य होऊ पाहणाऱ्यांसाठी 


'उच्च विद्याविभूषित झालो, पी.एच.डी.(Ph.D.) झालो म्हणजे आता आयुष्याची पुढची वर्षे आरामात कुठेतरी प्राचार्य म्हणून दिवस काढता येतील', अभियांत्रिकी मधील काही मंडळी  अश्या समजुतीत होती. काही वर्षापुर्वी तशी परिस्थिती देखील होती. प्राचार्याच्या खुर्चीत पी.एच.डी. झालेला शिक्षक बसला कि त्याला शिंगे फुटायची. परंतु आज रोजी परिस्थिती बदललेली आहे. पी.एच.डी. झालेली मंडळी प्राचार्य म्हणून ज्या-ज्या कॉलेजमध्ये जातील ती-ती सगळी कॉलेजेस कमी अधिक प्रमाणात काचेची आहेत. तेथील संस्थाचालक दुकान चालविण्यासाठी म्हणा अथवा नाईलाजाने म्हणा चुकीची कामे करतात आणि हि सर्व कामे प्राचार्यांच्या खुर्चीत बसलेल्याला करावी लागतात.

आज प्राचार्यांच्या खुर्चीत बसायचे, २-३ लाख पगार घ्यायचा आणि संस्थाचालक सांगतील ती खोटी माहिती प्रतिज्ञापत्रावर सरकारी प्राधिकरणांना सादर करायची. भविष्यातली स्वप्ने रंगवत असताना जर खुर्चीतल्या मस्तीमुळे एखादा दुखावला गेला तर नको-नको त्या केसेस अंगावर येतात, बदनामी होते ती वेगळी, तुमच्या पी.एच.डी. ला पण कोणी विचारीत नाहीत आणि दुसरीकडे प्राचार्य म्हणून जायचे तर तिथेही हीच परिस्थिती. ज्या शिक्षकांवर तुम्ही अधिकार गाजविला, वेळ आल्यावर तेही विचारीत नाहीत आणि एवढे करूनही स्वतःचे शैक्षणिक योगदान शून्य.

खरे संशोधन करणारे पी.एच.डी. धारक प्राध्यापक, त्यांना प्राचार्य पदात कधीच रस नसतो. ते आपआपल्या शैक्षणिक क्षेत्रात रममाण असतात. तिथे त्यांचे संशोधन आणि विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम अखंड चालूच असते. शेवटी एखादे कॉलेज अथवा आय.आय.टी. सारखी संस्था हि तेथील डायरेक्टर अथवा प्राचार्य खूप हुशार आहे म्हणून नावारूपाला येत नाही तर तेथे असणारे अभ्यासू शिक्षक आणि विद्यार्थ्यांमुळे ती नावारूपाला येते.

त्यामुळे प्राचार्य होऊन आयुष्य सुखात काढण्याच्या भ्रमात कोणीही न राहता आपलं मूळ काम हे शिक्षकाचं आहे आणि तेच आम्ही प्राधान्याने केलं पाहिजे.

अभियांत्रिकी मधून पी.एच.डी. झालेल्यांनी प्राचार्यांच्या खुर्चीत जरूर बसावे, रिटायर्ड होईपर्यंतची आपली स्वप्ने रंगवावीत परंतु त्याच बरोबर शिक्षकांना बरोबर घेऊनच आपल्याला कॉलेजचा आणि सर्वांचा विकास करायचा आहे. सगळ्यांना घेऊन पुढे जायचे आहे हे हि लक्षात ठेवणे गरजेचे आहे. शिक्षकांना विनाकारण त्रास देऊ नये नाहीतर हेच फाटके शिक्षक तुमच्या स्वप्नांवर कधी पाणी फिरवतील याचा नेम नाही.

अभियांत्रिकी मधून पी.एच.डी. झालेल्यांना आणि प्राचार्य होऊ पाहणाऱ्यांसहित, जुन्या-नव्या या सगळ्यांनीच बदललेल्या परिस्थितीचे भान ठेवणे गरजेचे आहे.