Monday, January 18, 2010

माहिती अधिकार कायदा धाब्यावर...कुलसचिवांची दादागिरी....




मी विद्यापीठात पी.एच.डी.च्या संदर्भात माहितीच्या अधिकारात दि.२४/०३/०९ रोजी काही माहिती मागविली होती.माहिती अधिकारी विलास शिंदे यांनी कायद्यात तीस दिवसात माहिती देणे बंधनकारक असताना तब्बल ४७ दिवसांनी माहिती दिली तीही अपूर्ण.म्हणून मी प्रथम अपील कुलसचिव श्री व्यंकटरमणी यांच्याकडे केले.याची सुनावणी कुलसचिवांनी दि.२८/०७/०९ रोजी घेतली परंतु सुनावणी आदेश दिलाच नाही.(माहिती आयुक्तांकडे अपील केल्यानंतर कुलसचिव जागे झाले व तब्बल तीन महिन्यांनतर दि. २१/११/०९ रोजी आदेश दिला पण माहिती मिळाली नाही.इथेही कायद्याचे उल्लंघन केले.)

कुलसचिवांकडून न्याय न मिळाल्याने मी राज्य माहिती आयुक्तांकडे दाद मागितली.यावर आयुक्तांनी विद्यापीठाला माझी सुनावणी घेऊन माहिती देण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी व माझे प्रतिनिधी,माहिती अधिकारचे कार्यकर्ते श्री एस.के.नांगीया सुनावणीला हजार राहिलो.आम्ही दोघेही सुनावणीला हजर होतो परंतु माहिती अधिकारी श्री विलास शिंदे हे गैरहजर होते.म्हणून मी ते सुनावणीला का अनुपस्थितीत आहेत याची विचारणा कुलसचिवांनकडे केली असता अचानक अपिलिय अधिकारी श्री व्यंकटरमणी खवळले.तुम्ही शांत बसा.मला सुनावणी घ्यायची नाही असेही म्हणाले.यावर नांगीया यांनी,माहिती अधिकार कायदा हा जनतेसाठी आहे व जनतेला विचारण्याचा,जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे हे समाजावत असतानाच व्यंकटरमणी यांनी तार स्वरात "तुम्हाला जे करायचे ते करा,जिथे जायचे असेल तिथे जा.मी कोणाला घाबरत नाही" असे उद्दांमपणे सांगितले.व सुनावणी न घेताच तेथून निघून गेले.(येथे सुद्धा कायद्याचा अपमान केला.)परत आल्यानंतर देखील त्यांनी सुनावणी घेतली नाही व मला पाहिजे तो आदेश मी देईन असे सांगितले.

अहो व्यंकटरमणी विद्यापीठ म्हणजे स्वतः च्या मालकीची मालमत्ता आहे असे आपल्याला वाटते का? विलास शिंदे यांना परीक्षा नियंत्रक करण्यात कुलसचिवांचा सिंहाचा वाटा आहे हे सर्व श्रुत आहे.त्याच प्रमाणे विलास शिंदे स्वतः परीक्षा नियंत्रक असून व विद्यापीठातूनच पी.एच.डी.करीत आहेत व आज पी.एच.डी.च्या संदर्भात त्यांनी माहिती न दिल्याने स्वतःचे पीतळ उघडे पडेल म्हणून ते जाणीव पूर्वक अनुपस्थितीत राहीले.केवळ शिंदे यांना वाचविण्यासाठीच व्यंकटरमणी यांनी ही आदळाआपट केली.

यापूर्वी देखील माहिती आयुक्तांनी व्यंकटरमणी यांना खडसावले आहे.तुम्ही आर.बी.आय.चे गवर्नर आहात काय?असा टोला लागवला आहे.तरीही विद्यापीठातील हे अधिकारी अधिसभा सदस्यला माहिती देत नाहीत.यावरून जनतेला हे अधिकारी काय माहिती देत असतील याची कल्पना येते.

जनाची नाही निदान मनाची तरी लाज माणसाला वाटते पण ज्यांनी लाज सोडली त्यांच्याविषयी काय बोलायचे?

माहिती अधिकार कायद्याची वेळोवेळी पायमल्ली करणारे कुलसचिव श्री व्यंकटरमणी यांची आता कुलगुरूंनी विभागीय चौकशी करावी.व या प्रकरणात तात्काळ माहिती आयुक्तांनी लक्ष घालावे.अशी लेखी मागणी मी यापूर्वीच केलेली आहे.मा.कुलगुरू आणि मा.मुख्य माहिती आयुक्त योग्य ती कारवाई करतीलच पण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे कुलसाचिव तुम्हाला येत्या अधिसभेत द्यावी लागतील हे ध्यानात घ्या.माहिती अधिकार कायदा हा जनतेसाठी आहे.ह्या कायद्यासाठी देशभर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी उपोषने केली,आंदोलने केली,निदर्शने केली,मोर्चे निघाले,घंटा नाद झाले आणि तब्बल १८ दिवसाच्या उपोषणानंतर मा.राष्ट्रपतींनी हा कायदा संमत केला.जनता ह्या देशाची मालक आहे आणि आम्हाला पूर्ण अधिकार आहे माहिती मागण्याचा.तुम्ही खुर्चिवर बसून काय करता हे विचारण्याचा आणि तो यापुढे कोणालाही न घाबरता,न जुमानता आम्ही विचारणारच.

जय हो!!!

Saturday, September 5, 2009

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!



भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्‍यातही सुरूच राहिल.
परंतु त्याच बरोबर हा २८ नोव्हेंबर ! हा दिवस सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. भारतीय शैक्षणिक व सामाजिक क्रांतिचे अग्रदूत महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतीदिन! बहुजनांच्या शिक्षणासाठी आपले संपुर्ण आयुष्य वाहून घेणाऱ्या या महात्म्याला त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त मनःपुर्वक आदरांजली आपण वाहिली पाहिजे. बहुजनांच्या शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या या महात्म्याच्या कार्याला वंदन करून २८ नोव्हे. हा दिवस सुद्धा शिक्षक दिन म्हणून आपण पाळला पाहिजे ही प्रामाणिक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो.
सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!