Monday, August 31, 2009

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव शिवदास यांच्या मनमानीपणाचा मराठी बीएमएमला फटका



मराठी अभ्यास केंद्र


सक्षम मराठी... प्रगत महाराष्ट्र
(नोंदणी क्रमांक- महा/६९४/०९/ठाणे)कार्यालय संपर्क - ३, यमुना निवास, गोविंद बच्चाजी मार्ग, चरई, ठाणे- ४०० ६०२. दू- २५३४३६१९


उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव शिवदास यांच्या मनमानीपणाचा मराठी बीएमएमला फटका

बीएमएम मराठी अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २००९-१० मध्ये सुरु करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी मंजुरी देऊनदेखील त्या विभागातील सहसचिव शिवदास यांच्या आडमुठेपणामुळे ह्यासंदर्भातील शासन निर्णय निघण्यास विनाकारण वेळ लागत आहे. याचा फटका हा अभ्यासक्रम राबवण्यासाठी गेले दीड महिना विनाकारण ताटकळत बसलेल्या चौदा महाविद्यालयांना पडला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारानंतर व उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या निर्णयानंतरही यात आडकाठी आणणाऱ्या सहसचिव शिवदास यांच्या मुजोर वर्तनाबद्दल विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
बीएमएम मराठीच्या अनुमतीचे पत्र (क्रमांक-एनजीसी-२००९/(१०६/०९)/मशि- ४) उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २५ जून २००९ रोजीच प्रसिद्ध केलेले आहे. या पत्रात हा अभ्यासक्रम या वर्षी चालू करण्याचे नि:संदिग्ध आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे याच पत्रात विद्यापीठ कायद्यातील मान्यतेबाबतच्या तरतुदींना अपवाद करून महाविद्यालयांचे प्रस्ताव मागवून घेण्याचे स्पष्ट निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहेत.
या पत्राच्या आधारावरच हा अभ्यासक्रम राबविण्यासाठी आवश्यक संलग्नता प्रस्ताव मुंबई विद्यापीठाने मागवले. मिळालेल्या प्रस्तावांची आवश्यक सोयीसुविधा व अध्यापन-तयारी अशा निकषांवर योग्यप्रकारे छाननी करुनच बावीसपैकी चौदा महाविद्यालयांचे प्रस्ताव विद्यापीठाने स्वीकारले. यात चिपळूण, भाईंदर, विरार, कळंबोली येथील महाविद्यालयांचादेखील समावेश आहे. विद्यापीठाच्या महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळ आणि व्यवस्थापन परिषद यांनी रीतसर मंजुरी दिलेले प्रस्ताव २४ जुलै रोजी शासनाला सादर केले गेले. त्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी सही केलेली असतानादेखील त्या खात्यातील सहसचिव शिवदास यांनी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले आहे. जवळपास साठ महाविद्यालयांत शिकवल्या जाणाऱ्या इंग्रजी बीएमएममध्ये अनेक महाविद्यालयांत सोयी-सुविधांच्या नावाने बोंब असतानादेखील त्यांना मात्र त्वरीत मान्यता मिळते, मात्र केवळ मराठीच्या बीएमएमच्या बाबतीतच प्राध्यापकांची उपलब्धता वगैरे गोष्टींबाबत विनाकारण बाऊ करण्यात येत आहे. मराठी बीएमएमची फाईल लाल फितीत कशी अडकून राहिल याचीच ‘काळजी’ हे सहसचिव घेत असून त्यामुळे मंत्र्यांच्या निर्णयाचे व लोकप्रतिनीधींच्या आग्रहाची उघडउघड पायमल्ली होत आहे.
काल उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधानसचिव जे.एस. सहारिया यांच्या दालनात मराठी अभ्यास केंद्राच्या प्रतिनिधीनीं श्री. शिवदास यांची भेट घेतली. हा अभ्यासक्रम चालवण्यासाठी प्रस्तावित महाविद्यालये सक्षम आहेत का असा प्रश्न शिवदास यांनी अभ्यास केंद्राच्या प्रतिनिधीना विचारला. त्यावर या चौदा महाविद्यालयांचे प्रस्ताव विद्यापीठाने रीतसर छाननी करुनच पाठवले असल्याने त्यांची सक्षमता विद्यापीठाने तपासलीच आहे अशी भूमिका या प्रतिनिधींनी मांडली. यानंतर अभ्यास केंद्राने कुलगुरु डॉ.विजय खोले यांच्याशी संपर्क साधला असता सहसचिव मंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली करत असल्यानेच या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
एखादा सहसचिव आपल्या अधिकारात चौदा महाविद्यालयांची संख्या चारवर आणू शकतो का ? मंत्र्यांनी सही केल्यावर शासननिर्णय जाहीर करण्यात वेळकाढूपणा करणार्‍या सहसचिवावर उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग काय कारवाई करणार आहे ? या दिरंगाईला विद्यापीठ आणि शासनातली मराठीद्वेष्ठी मंडळी मदत करताहेत का? असे प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत. गेले दोन महिने या नव्या अभ्यासक्रमाचा अकाली मृत्यू व्हावा यासाठी प्रयत्न करणार्‍या शिवदास यांच्या तात्काळ हकालपट्टीची मागणी मराठी अभ्यास केंद्राने केली आहे. याबाबतीत तात्काळ कारवाई झाली नाही तर विद्यार्थी संघटना व राजकीय पक्ष हा प्रश्न आपल्या पद्धतीने हाताळू शकतील व त्याची जबाबदारी शिवदास आणि त्यांच्या मराठीद्वेष्ट्या बोलवत्या धन्यांवर राहील असा इशारा अभ्यास केंद्राने दिला आहे.

No comments: