Thursday, May 28, 2009

विद्यापीठातील भ्रष्टाचाराच्या सीबीआय चौकशीची मागणी...

शहापूर येथील एका बी. एड. महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाची मान्यता मिळवून देण्यासाठी त्या बदल्यात संबंधित संस्थाचालकाकडून लाच घेताना मुंबई विद्यापीठाच्या संलग्नता विभागाचे उपकुलसचिव प्रकाश गोसावी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

हे महाविद्यालय सुरू करण्याची मंजुरी राज्य सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिली होती. या महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाची संलग्नता मिळण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्षांनी विद्यापीठात अर्ज केला होता. यानंतर विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीने डिसेंबर 2008 मध्ये महाविद्यालयाचे निरीक्षण करून जानेवारीमध्ये विद्यापीठाला अहवाल दिला होता. परंतु, महाविद्यालयाने अनेक निकष पूर्ण केले नसल्याने समितीने विद्यापीठाला नकारात्मक अहवाल सादर केला होता. परंतु, हा अहवाल हवा तसा करून संस्थेला झुकते माप देण्याचे आश्वासन गोसावी यांनी दिले. त्यासाठी त्यांनी ५० हजार रूपयांची लाच मागितली. त्यापैकी १० हजाराचा पहिला हप्ता संस्थाचालकांनी यापूर्वीच दिला होता. उरलेली रक्कम घेत असतानाच सापळा रचलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोसावी यांना रंगेहाथ पकडले. या घटनेचे तीव्र पडसाद शिक्षणक्षेत्रात उमटले आहेत.

गोसावींना झालेली अटक म्हणजे कुलगुरू उपकुलगुरू यांच्या कारभाराला काळीमा फासणारी त्यांच्या नाकर्तेपणाचे दर्शन घडविणारी घटना आहे, विद्यापीठाच्या या अशा अनेक गैरप्रकारांबाबत काही मोजकेच अधिसभा सदस्य नेहमी वाचा फोडत असतात, लेखी निवेदने देत असतात, पण बुरखा पांघरलेल्या कुलगुरू-उपकुलगुरूंवर त्याचा काहीही परिणाम होत नाही किंबहुना हेच उच्चपदस्थ अशा अधिकाऱ्यांच्या चुकांवर पांघरूण घालतात, असा आरोप 'मुक्ता'ने केला आहे.विद्यापीठातील या भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी कुलगुरू, प्र-कुलगुरू,कुलसचिव, तसेच परीक्षानियंत्रक यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी आम्ही करीत आहोत.